हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
नवी दिल्ली : चीनी मंडी
वाढती ऊस बिल थकबाकी हा भारतातील साखर उद्योगापुढील सर्वांत चिंतेचा विषय आहे. सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केली तसेच कारखान्यांना कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून दिले. त्यामुळे ऊस बिल थकबाकी वेगाने कमी होऊ शकते. पण, मार्च महिन्यासाठी सरकारने जाहीर केलेला देशांतर्गत बाजारपेठेसाठीचा २४.५ लाख टन विक्री कोटा साखर कारखाने आणि एकूणच साखर उद्योगासाठी हानीकारक ठरू शकतो, असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) म्हटले आहे.
मार्च महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या जास्त विक्री कोट्याचा साखर उद्योगावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असल्याचे ‘इस्मा’चे म्हणणे आहे. सध्या २२ फेब्रुवारीपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशातील एकूण ऊस बिल थकबाकी २० हजार १५९ कोटी रुपयांवर गेली आहे. ‘इस्मा’च्या म्हणण्यानुसार यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कधीच इतक्या मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढली नाही, असेही ‘इस्मा’ने म्हटले आहे.
सरकारने साखर कारखान्यांना नुकतेच १० हजार कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच साखरेच्या किमान विक्री दरात २९ रुपयांवरून ३१ रुपये अशी वाढ केली आहे. या उपाय-योजनांमुळे देशातील एकूण थकबाकी अतिशय वेगाने कमी होऊ शकेत, असे ‘इस्मा’चे म्हणणे आहे. साखरेचे अतिरिक्त उत्पादन आणि घसरत्या किमतींमुळे कारखान्यांकडे कॅश फ्लो कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यात अडचणी येत आहेत.
सरकारने गेल्या दीड वर्षांत साखर कारखाने आणि एकूणच साखर उद्योगाच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. ‘इस्मा’ने दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी यंदा पहिल्यांदाच ५१ कोटी लिटर इथेनॉल पूरवण्याची तयारी दर्शवली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत यातील १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठाही करण्यात आला आहे. या इथेनॉल उत्पादनामुळे देशातील एकूण साखर साठ्यातील एक लाख टन साखरेचा भार कमी झाला आहे.
‘इस्मा’च्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळात देशात ४७.६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ‘इस्मा’ने यंदाच्या हंगामात ३ कोटी ७ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या वर्षी ३ कोटी २५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यापेक्षा यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
देशात यंदा फेब्रुवारीपर्यंत ४६६ साखर कारखाने गाळप करत होते. महाराष्ट्रात आणि कर्नाटकमध्ये सध्या कारखाने गाळप बंद करू लागले आहेत. त्यामुळे हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. भारत जगात ब्राझीलनंतर दुसरा मोठा साखर उत्पादक देश असून, देशाची साखरेची मागणी २ कोटी ६० लाख टन आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp