नवी दिल्ली : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) सेगमेंटमधील वाहन निर्मितीला वेग आला आहे. इथेनॉलवर चालणारी इंजिन आणि हायड्रोजन इंधन सेल वाहनांसारख्या कार्बन फूटप्रिंट कमी करणाऱ्या, स्वच्छ इंधनाचा विचार करून भारत सरकारने ग्रीन मोबिलिटी इकोसिस्टमवर लक्ष केंद्रित केले आहे. ईव्ही उद्योगासह भारत २०७० पर्यंत ‘शून्य उत्सर्जना’च्या ध्येयाने कार्यरत आहे. जागतिक ग्रीन एनर्जी व्हेईकल मार्केटमध्ये भारताचे वर्चस्व राहील, असे मत सोसायटी ऑफ इंडिया ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) अध्यक्ष केनिची आयुकावा यांनी व्यक्त केले.
केनिची आयुकावा यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक कारच्या बाजारपेठेत भारताचा हिस्सा २०३० पर्यंत ३० टक्क्यांपर्यंत जाईल. २०२१-३० या दशकात भारतामधील ईव्ही बाजारपेठ गतीने वाढेल. वार्षिक १७ दशलक्ष युनिटच्या विक्री स्तरापर्यंत हा टप्पा गाठला जाईल. यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचा वाटा १५ दशलक्ष युनिटचा असेल. तर उर्वरीत २ दशलक्ष युनिटमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा समावेश राहील असे आयुकावा म्हणाले. प्रगत ऑटोमोटिव्ह उत्पादनातून तंत्रज्ञानाच्या प्रगतीला संधी मिळण्यासह इकोसिस्टमच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या गुजरातमधील आगामी लिथियम बॅटरी प्लांटचे काम सुरू आहे. अलिकडच्या घडामोडीत फॉक्सकॉनसोबत वेदांता १००० एकरचा सेमी कंडक्टर प्लांट उभारत आहे. यातून इतर स्थानिक घटकांना आणि इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर उद्योगाला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा असल्याचे आयुकावा यांनी सांगितले. ऑटो क्षेत्रात भारत लवकरच १०० टक्के स्वावलंबी होईल. अधिक गुंतवणुकीतून या विकासाला गती मिळेल असे आयुकावा म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अलिकडेच फ्लेक्स इंधनावरील वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याचे जाहीर केले आहे. त्यातही भारताचा ग्रीन एनर्जी व्हेइकल सेगमेंटमध्ये ईव्हीचा अधिक वाटा असेल. त्यांच्या नियोजनानुसार भारतातील पहिली फ्लेक्स इंधन कार २८ सप्टेंबर रोजी सादर केली जाणार आहे. केंद्र सरकारने जीवाश्म इंधनाचा वापर ग्रीन हायड्रोजनमध्ये करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे.