मंड्या : राज्य सरकारच्या मालकीच्या म्हैसूर शुगर कंपनी लिमिटेडने (मायशुगर) अलिकडेच गाळप सुरू केले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. कारखान्याच्या दुसऱ्या बॉयलरचे काम २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंड्या जिल्ह्याचे प्रभारी मंत्री गोपालय्या यांनी सांगितले की, आपल्या अधिकार क्षेत्राबाहेरील उसाची तोडणी करू नये असे निर्देश ऊस उपायुक्तांनी इतर सर्व कारखान्यांना दिले आहेत. मायशुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस इतरांकडून तोडला जावू नये याची दक्षता घेतली जात आहे. कारखान्यातील गाळप क्षमतेचा आढावा घेतल्यानंतर मंत्री गोपालय्या यांनी सांगितले की, जर मायशुगर कारखान्याशी संलग्न ऊस इतर कारखान्यांकडून घेतला जात असेल तर तो जप्त केला जाईल.
मंत्री गोपालय्या यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, शेतकऱ्यांकडून उचल केलेल्या उसाचे कारखान्याने वेळेवर पैसे दिले पाहिजेत. जर उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला तरच ते कारखान्याला ऊस पुरवठा सुरू ठेवतील. सर्व विभागांच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी कारखान्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्याची तयारी सुरू केली आहे. त्याआधी मी कारखान्याची पाहणी करणार आहे. कारखान्याला या हंगामात ४००० टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याचे प्रयत्नपूर्वक पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
१९३३ मध्ये या कारखान्याची स्थापना करण्यात आली. तोटा आणि इतर समस्यांमुळे कारखाना बंद करण्यात आला होता. मात्र, अनेक खाजगी कंपन्यांनी मायशुगर चालविण्यात स्वारस्य दर्शविले होते. तरीही कारखाना पुन्हा चालू होऊ शकला नाही. गेल्या वर्षी बसवराज बोम्मई सरकारने अंदाजपत्रकात कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी ५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.