नवी दिल्ली : जर तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डवरून जादा पैशांची देवाण-घेवाण करीत असाल तर एक चांगला बदल घडला आहे. आता कोणत्याही व्यावसायिक वेबसाइटला तुमचा कार्ड नंबर, सीव्हीसी, एक्स्पायरी डेट ही माहिती ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी साठवून ठेवता येणार नाहीत. कार्डचा वापर करताना युझरला कोणत्याही वेबसाइटवरून काही वस्तू खरेदी करताना टोकन तयार करावे लागेल. या टोकनवरून त्याला त्या वेबसाइटवरील खरेदी करता येणार आहे. पैसे देताना हे टोकन तुम्ही तयार करू शकता आणि त्याचा वापर नंतर करू शकता.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, डेबिट आणि क्रेडिट कार्ड टोकनायझेशन ही प्रक्रिया सध्या अनिवार्य नाही. ग्राहकाकडे आपले कार्ड वेबसाइटवर टोकनायझेशन न करण्याचा पर्यायही आहे. अशा स्थितीत ग्राहकाला वेबसाइटवरून पैसे देताना डिटेल्स भरावे लागतील. १६ अंकी कार्ड नंबर, एक्स्पायरी डेट, कार्ड व्हेरिफिकेशन व्हॅल्यू (सीव्हीसी) यांचा यात समावेश असेल. टोकनायझेशन केल्यास जर वेबसाइटचा डेटा लिक झाला तर फसवणूक करणारे सायबर चोरटे तुमच्या कार्डचा गैरवापर करू शकणार नाहीत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार देशातील ३५ कोटी कार्ड टोकनमध्ये बदलण्यात आली आहेत. एक ऑक्टोबरपासून ती वापरण्यास तयार आहेत. डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर यांनी सांगितले की, जे लोक सध्या ही प्रणाली वापरास अनुत्सुक आहेत, ते नंतर या प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास आम्हाला आहे.