पंजाबमध्ये ऊस दरात प्रती क्विंटल २० रुपयांची वाढ, मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा

पंजाब सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ऊस दरात प्रती क्विंटल २० रुपयांची वाढ केली. त्यामुळे आता पंजाबमध्ये ऊस दर प्रती क्विंटल ३८० रुपये झाला आहे. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही घोषणा केली. सभागृहात मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आगामी गळीत हंगामासाठी ऊसाची एसएपी प्रती क्विंटल २० रुपयांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उसाचा दर ३६० रुपये प्रती क्विंटलवरून वाढून ३८० रुपये प्रती क्विंटल झाला आहे. या निर्णयामुळे सरकारकडून दरवर्षी २०० कोटी रुपये खर्च केले जातील.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, राज्यातील शेतकरी ऊस उत्पादन करू इच्छितात. मात्र, यापूर्वी चांगला दर मिळत नसल्याने आणि उत्पन्न कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ऊस पिकापासून स्वतःला दूर ठेवणे पसंत केले होते. सध्या पंजाबमध्ये १.२५ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पिक घेतले जाते. मात्र राज्यातील साखर कारखान्यांची उत्पादन क्षमता २.५० लाख हेक्टरमधील ऊस गाळपाची आहे. त्यामुळे उत्पादकांच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी दरवाढीची घोषणा करण्यात येत आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी सर्व ऊस बिले दिली आहेत. मात्र, दोन खासगी साखर कारखान्यांनी अद्याप पैसे दिलेले नाहीत. या कारखान्यांचे मालक देश सोडून गेले आहेत. सरकारने त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here