नवांशहर : सरकारने ऊसाचा दर प्रती क्विंटल २० रुपये वाढवल्यानंतर नवाशहरमधील सुमारे २ हजारहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपये जादा मिळणार आहेत. यापूर्वी उसाचा दर ३६० रुपये प्रती क्विंटल होता. सरकारने तो आता ३८० रुपये केला आहे. कारखान्याने आतापर्यंत ३२ लाख क्विंटल उसाचा करार केला आहे. त्यानुसार, प्रती क्विंटल २० रुपये दराने जवळपास ६ कोटी ४० लाख रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दोआबा शेतकरी युनियनचे नेते अमरजित सिंह यांनी सांगितले की, संघटनेने सरकारकडे ४०० रुपये क्विंटल दराची मागणी केली होती. मात्र, सरकारने हा दर ३८० रुपये केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ऊस हे दीर्घकालीन पिक आहे. त्यासाठी शेत जमीन अडून राहते. याशिवाय, औषधे, खते, किटकनाशके, पिकाच्या देखभालीवर जादा पैसे खर्च होतात. त्यामुळे शेतकऱ्याला योग्य दर मिळण्याची गरज आहे. सरकारने २० रुपये प्रती क्विंटल दर वाढवल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.