महाराष्ट्र : नाशिकमध्ये प्रवासी बसला आगीत ११ जणांचा मृत्यू, ३८ जण होरपळले

महाराष्ट्रातील नाशिकमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. एका लक्झरी बसला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेत ३८ जण होरपळले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंतच्या मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नाशिकमधील नांदूर नाक्यानजीक औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेलजवळ पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यवतमाळहून मुंबईकडे जाणाऱ्या बसला कंटेनरने धडक दिल्याने आग लागली. कंटेनर नाशिकहून पुण्याकडे जात होता. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लक्झरी बस आगीचा गोळा बनल्याचे आणि त्यातून धुराचे लोट येत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. याबाबत नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे म्हणाले, “मृतांपैकी बहुतेकजण बसमधील स्लीपर कोचचे प्रवासी होते. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.” याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच अपघातात जखमी झालेल्यांना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here