अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे “भारत-अमेरिका यांच्या धोरणात्मक भागीदारीतील संधी” या विषयावर आयोजित गोलमेज चर्चासत्रात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस पुरी म्हणाले की येत्या दोन दशकांतील उर्जेच्या एकूण जागतिक पातळीवरील मागणीपैकी 25% उर्जा भारतामध्ये निर्माण केली जाणार आहे. भारताचे उर्जाविषयक धोरण हे जागतिक मागणी, हरित संक्रमण आणि सर्वांसाठी उर्जेची उपलब्धता, किफायतशीरपणा आणि सुरक्षितता यांची सुनिश्चितता करण्यासाठी जागरूकतेने योगदान देणारे आहे याकडे त्यांनी निर्देश केला. भारताने हायड्रोजन आणि जैव इंधनांसारख्या उदयोन्मुख इंधनांच्या वापरासह अशाच इतर इंधनांच्या उपयोगातून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. सध्याचे उर्जाविषयक वातावरण आव्हानात्मक असूनही, भारताची उर्जा संक्रमण आणि हवामान बदलविषयक ध्येयांबाबत असलेली वचनबद्धता जराही कमी होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या “भारत-अमेरिका यांच्या धोरणात्मक भागीदारीतील संधी” या विषयावरील गोलमेज चर्चासत्राचे अध्यक्षपद केंद्रीय मंत्री हरदीप एस.पुरी यांनी भूषविले. एक्झॉनमोबिल, शेव्हरॉन, शीनीएर, लांझाटेक, हनीवेल, बेकरह्युज, इमर्सन, टेल्युरीयन अशा उर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसह एकूण 35 कंपन्यांचे 60 हून अधिक प्रतिनिधी या गोलमेज चर्चासत्रात सहभागी झाले. भारतीय उर्जा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री पुरी म्हणाले की उर्जेचे संशोधन तसेच उत्पादन या प्रक्रिया तर्कशुद्ध स्वरूपाच्या करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने उर्जा उत्पादनासाठी आतापर्यंत अस्पर्शित भागांचे प्रमाण 99%नी कमी करणे तसेच राष्ट्रीय भांडारण नोंदणी इत्यादींच्या माध्यमातून उत्तम दर्जाचा भौगोलिक माहितीचा साठा उपलब्ध करून देणे अशा काही प्रमुख सुधारणा हाती घेतल्या आहेत.
ट्विट संदेशांच्या मालिकेत हरदीप एस पुरी म्हणाले की, भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जैवइंधने, वायू आधारित अर्थव्यवस्था, हरित हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स तसेच अपस्ट्रीम क्षेत्रांबाबत अमर्याद क्षमता आहे आणि आपल्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहकारी संबंधांच्या माध्यमातून त्यात अधिकच वाढ होत आहे. ते पुढे म्हणाले, “मोदी सरकारने हाती घेतलेल्या सुधारणात्मक उपाययोजनांमुळे जागतिक तेल कंपन्यांची भारतीय उर्जा संशोधन तसेच उत्पादन यामधील रुची अभूतपूर्व प्रमाणात वाढली आहे.”
भारतातील पारंपरिक आणि नूतन अशा दोन्ही उर्जा प्रकारांतील सर्वोत्तम तंत्रज्ञान मिळविता येईल अशा संभाव्य भागीदारींसह सर्व सहभागींकडून विस्तृत पायावर आधारित पाठींबा मिळविण्याच्या चर्चेसोबत हे चर्चासत्र समाप्त झाले.