नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा करताना ३,९७,२६७ टन तुकडा तांदळाच्या शिपमेंट निर्यातीस अनुमती दिली आहे. ८ सप्टेंबरपूर्वी जारी करण्यात आलेल्या लेटर ऑफ क्रेडिटमध्ये समाविष्ट असलेल्या तांदळाच्या निर्यातीस ही परवानही दिली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या एका अधिसूचनेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू करण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ८ सप्टेंबरपूर्वी जारी केलेल्या लेटर ऑफ क्रेडिटमध्ये समाविष्ट ३,९७,२६७ टन तुकडा तांदळाच्या शिपमेंटला परवानगी देईल.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आठ सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने कार्गोच्या लोडिंगवर तातडीने बंदी घातली होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात बंदरात हा साठा अडकला होता. भारत तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. जागतिक व्यापारात याचा हिस्सा ४० टक्के आहे. भारताकडून १५० देशांना तांदूळ निर्यात केला जातो. देशातील काही राज्यांत पाऊस कमी झाल्याने भाताच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. रॉयटर्सच्या अहवालानुसार सरकारने १० लाख टन तांदूळ अडकला होता. याबाबत राईस एक्स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव यांच्या म्हणण्यानुसार, आधी मंजूरी घेतलेल्या तुकडा तांदळाच्या निर्यातीस सरकारने परवानगी दिली तर व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकेल. एका रिपोर्टनुसार गेल्या वर्षी, २०२१ मध्ये १.१ मिलियन टन खरेदी करून चीन हा भारतीय तुकडा तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार ठरला होता. भारताने गेल्या वर्षी २.१२ कोटी टन तांदूळ निर्यात केला होता.