पुणे : सततच्या पावसाने आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगामात उशीर होण्याची शक्यता आहे. साखर कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीनंतरच गाळप सुरू होईल. महाराष्ट्रात २०२१-२२ मध्ये गळीत हंगाम लाबल्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १ ऑक्टोबरपासून २०२२-२३ चा गळीत हंगाम सुरू करण्याची घोषणा केली होती. कारखानदारांना याची तयारी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. उच्चांकी गाळपामुळे २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात गळीत हंगाम जूनच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहिला होता. या हंगामात गळीत सत्र लवकर सुरू करण्याच्या योजनेनंतरही बहुतांश कारखान्यांनी अद्याप कामकाज सुरू केलेले नाही. सातत्याने सुरू राहिलेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साठले आहे.
राज्यात तोडणी आणि वाहतूक करणारे कामगारही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात पोहोचलेले नाहीत. जोरदार पावसामुळे मराठवाडा विभागात कोणताही साखर कारखाना सुरू होऊ शकला नाही. या भागात अद्याप पाऊस सुरू आहे. दिवाळीला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झालेला नाही. या हंगामात महाराष्ट्रात १,३४२ लाख टन ऊसाचे गाळप आणि १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.