लखनौ : उत्तर प्रदेशातील काही कारखाने निर्यातीच्या गुणवत्तेची साखर उत्पादीत करण्याची तयारी सुरू आहे, असे साखर आणि ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले की, साखर कारखाने अधिक उत्पादन मिळवणे आणि आत्मनिर्भर बनण्यासाठी इथेनॉल उत्पादक डिस्टिलरी युनिट जोडले जात आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. मंत्री चौधरी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश पुन्हा सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य बनणार आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याने आपले हे स्थान टिकवून ठेवले होते. अलिकडे झालेल्या अवकाळी पावसाने राज्य द्वितीय क्रमांकावर गेले आहे.
ते म्हणाले की, राज्यात २००७ ते २०१२ या काळात १९ कारखान्यांची विक्री केली गेली. तर २०१२ ते २०१७ या काळात ११ साखर कारखाने शेतकऱ्यांची बिले देण्यापूर्वी बंद करण्यात आले. राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. जेव्हापासून भाजपचे सरकार सत्तेवर आले आहे, तेव्हापासून एकही कारखाना विक्री झालेला नाही किंवा तो बंद करण्यात आलेला नाही.
चौधरी म्हणाले की, अनेक कारखाने आत्मनिर्भर बनले आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातींची निश्चिती करण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात आहे. ऊसाच्या उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना आता ऊस खरेदी केंद्रांवर योग्य पद्धतीने खरेदीसह अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजातींच्या उसाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे.