युनायटेड नेशन्सच्या नेतृत्वाखालील ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’ ने युद्धग्रस्त युक्रेनमधून धान्य निर्यात करू इच्छिणाऱ्या लाखो लोकांसाठी आशा निर्माण केली आहे, असे युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅमच्या (UNCTAD) नवीन अहवालात म्हटले आहे. वाढत्यात किमती आणि अन्न पुरवठ्यातील अडचणींमुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. धान्य निर्यात उपक्रमाची मुदत संपण्यास थोडा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पुन्हा पुढाकार घ्यावा लागेल असे युएन एजन्सीने म्हटले आहे.
याबाबत यूएन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी जुलैमध्ये संयुक्त राष्ट्र प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांच्या नेतृत्वाखाली युक्रेन, रशिया आणि तुर्कस्थानने धान्य निर्यातीसाठी या उपक्रमावर सहमती दर्शवली होती. तेव्हापासूनच, युक्रेनमधील बंदरांवर कामकाज वाढले आहे. धान्याची मोठी खेप जागतिक बाजारपेठेत पाठविली जात आहे. या करारानुसार रशियाकडून खतांची निर्यातही वाढवली जाणार आहे. ब्लॅक सी ग्रेन एक्सपोर्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत ८० लाख मेट्रिक टन अन्नधान्य आणि इतर खाद्यपदार्थांची निर्यात करण्यात आली आहे. अहवालानुसार, यूएन-नेतृत्वाच्या या उपक्रमामुळे जागतिक अन्नधान्याच्या किमती स्थिर होण्यास आणि नंतर कमी होण्यास मदत झाली आहे.