हिस्सार : हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सारच्यावतीने विकसित गव्हाच्या प्रगत प्रजाती डब्ल्यूएच १२७० चा प्रसार आता हरियाणा नव्हे तर देशाच्या इतर राज्यांतही करण्यात येणार आहे. एचएयूचे कुलगुरू प्रा. बी. आर. कांबोज यांनी कंपन्यांसोबतच्या सामंजस्य करारावेळी ही माहिती दिली. ते म्हणाले की, या प्रजातीचे उत्पादन आणि रोग प्रतिकारक शक्ती पाहता याची मागणी इतर राज्यांतूनही वाढत आहे. त्यामुळे पुढील हंगामात अधिकाधिक बियाणे मिळविण्यासाठी विद्यापीठाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपअंतर्गत तांत्रिक व्यावसायिकरणाला पाठबळ देत खासगी बियाणे कंपन्यांशी करार केला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विद्यापीठाच्यावतीने विकसित गव्हाची डब्ल्यूएच १२७० ही प्रजाती देशाच्या उत्तर पश्चिम भागातील सिंचन क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांचा समावेश आहे. सरासरी ७५.८ क्विंटल प्रती हेक्टर याची उत्पादन क्षमता आहे. तर सर्वोच्च उत्पादकता ९१.५ क्विंटल प्रती हे्टर आहे. गव्हावर नेहमी पडणाऱ्या रोगांचा या प्रजातीवर फारसा परिणाम होत नाही असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.