हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
अंबाला (हरियाणा) : चीनी मंडी
उत्तर भारतामध्ये ऊस बिल थकबाकीचा प्रश्न अजूनही कायम असून, शेतकरी थकबाकी मिळावी यासाठी आक्रमक झाले आहेत. हरियाणामधील अंबाला येथील साखर कारखान्याच्याबाहेर भारतीय किसान युनियनने धरणे आंदोलन करून, साखर कारखाना व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या १२५ कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
भारतीय किसान युनियनचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष गौरव टिकैत यांनी साखर कारखान्याबाहेरील धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले. युनियन आणि कारखाना व्यवस्थापन तसेच जिल्हा प्रशासन यांच्या झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. येत्या रविवारपर्यंत उसाची थकबाकी दिला नाही तर, साखर कारखान्याच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याचा इशारा युनियनने दिला आहे.
या वेळी टिकैत म्हणाले, ‘शेतकरी आपले पैसे घेण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी दिवस-रात्र एक करून ऊस शेती केली आणि ऊस कारखान्याला विकला. यानंतर आता शेतकऱ्याला त्याच्या पै अन पैसाठी हात पसरावे लागत आहेत. जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांचे ऐकून घेण्याऐवजी साखर कारखाना व्यवस्थापनाची बाजू घेत आहे. जर, प्रशासनाने शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हातात त्यांचे पैसे मिळाले असते. आता युनियन शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या हातात पडत नाहीत. तोपर्यंत आम्ही खंबीरपणे उभे राहू. जर, साखर कारखान्याचा उद्देश शेतकऱ्यांच्या भल्याचा आहे तर, त्यांनी शेतकऱ्यांना चेक द्यावेत. ज्या शेतकऱ्यांना चेकद्वारे उसाचे बिल हवे आहे त्यांनी यादी करून कारखाना प्रशासनाला द्यावी.’
या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी आदिती यांनी सांगितले की, चेकद्वारे पेमेंट करण्याची एक मर्यादा असते. ऊस नियंत्रण कायद्यानुसार उसाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जायला हवेत. या संदर्भात साखर आयुक्तच योग्य पर्याय सांगू शकतील. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी हात झटकले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस आयुक्तांना विचारून कारखान्याला दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा थेट व्यवहार कारखाना व्यवस्थापनाशी आहे. जिल्हा प्रशासनाशी नाही. त्यामुळे साखर आयुक्तांचा हस्तक्षेप गरजेचा नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांनी ऊस बिल मिळेपर्यंत कारखान्याबाहेर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp