नवी दिल्ली : देशातील पहिल्या क्रमांकाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली सर्व वाहने पुढील वर्षापर्यंत E २० इंधनावर धावतील असे स्पष्ट केले आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व ऑटोमोबाइल उत्पादकांना एप्रिल २०२३ पर्यंत आपली सर्व वाहने E२० इंधनावर चालणारी बनविणे अनिवार्य केले आहे. यामुळे देशात कार्बन उत्सर्जनमध्ये कपात होईल आणि २०७० पर्यंत शुद्ध शून्य उत्सर्जनाचा टप्पा गाठण्यास मदत मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.
मारुती सुझुकीचे मुख्य तांत्रिक अधिकारी सी. व्ही. रमण यांनी सांगितले की, कंपनी सर्व श्रेणीतील आपली वाहने E २० च्या निकषानुसार बनविणार आहे. सद्यस्थितीत भारतात पेट्रोलमध्ये १० ते १५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते. पुढील वर्षी एप्रिल पर्यंत इथेनॉल मिश्रण वाढवून २० ते २५ टक्के केले जाणार आहे. त्यातून कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल आणि इंधन अर्थव्यवस्था वाढीस मदत मिळेल. E २० इंधनात बदलामुळे आयात इंधनावरील भारताचे अवलंबित्व कमी होईल. रमण यांनी सांगितले की, वाहनांना E २० अनुकूल बनविण्यासाठी इंजिन रिकॅलिब्रेट करण्याची गरज आहे.