पणजी, गोवा, दि. 19: आधुनिक गोव्याचे शिल्पकार असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे फक्त गोव्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातील एक आश्वासक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पणजी येथे श्रद्धांजली अर्पण केली.
देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी सकाळी पणजी येथील कला अकादमीमध्ये ठेवण्यात आले होते. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे अंत्यदर्शन घेतले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अत्यंत साधी राहणी असलेल्या श्री. पर्रिकर यांची निर्णय क्षमता उच्च दर्जाची होती. त्यासोबतच पारदर्शी कारभारामुळे त्यांचे राजकारणातील वेगळेपण अधोरेखित झाले होते. गोव्याच्या राजकारणात त्यांनी पारदर्शकता आणली. सर्वांनाच मोठ्या व्यक्तीसारखे आणि मोठ्या मित्रासारखे असे ते होते. आज देशाने एक सच्चा सुपूत्र गमावला आहे. त्यांची कमतरता आम्हाला कायमच जाणवेल.
पणजी येथील मिरामार किनाऱ्यावर सायंकाळी स्व. मनोहर पर्रिकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी कला अकादमीपासून मिरामार किनाऱ्यापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह गोव्याचे सर्व मंत्री व हजारो नागरिक सहभागी झाले होते.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp