जकार्ता : इंडोनेशियामध्ये शुगर टॅक्स लागू करण्यासाठीच्या प्रक्रियेने गती घेतली आहे. जादा साखरेचा समावेश असलेले स्नॅक्स आणि पॅकेज्ड ड्रिंक्सचा वाढता खप लक्षात घेता शुगर टॅक्स लागू करण्यासाठी सरकारकडे याचिका दाखल होऊ लागल्या आहेत. एयरलंगा विद्यापीठ (यूएनएआयआर) सुराबायाचे सार्वजनिक आरोग्य संशोधन एर्नावाटी यांनी सांगितले की, सरकारने ही याचिका गंभीरपणे घेतली पाहिजे, कारण अनेक इंडोनेशियन नागरिक सध्या साखरेचा समावेश असलेल्या स्नॅक्स आणि शितपेयांचे शौकीन आहेत. त्यांनी दावा केला की, या खाद्यपदार्थांच्या किमती वाढाव्यात आणि लोकांनी याची खरेदी करताना दोनदा विचार करावा यासाठी सरकारला यावर शुगर टॅक्स लावायचा आहे.
सरकारने आधी साखरेचा समावेश असलेल्या स्नॅक्स आणि पॅकेज्ड ड्रिंक्सवर २० टक्के कर आकारणीचा विचार केला होता आणि आता टॅक्स लागू करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती एकवटली जात आहे. गेल्या वीस वर्षात साखरयुक्त शीतपेयांच्या खपात १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.
मात्र, जर देशात शुगर टॅक्स लागू झाला तर साखरेच्या खपात घसरण होऊ शकते आणि या उद्योगातील अनेकांना नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते असेही सांगितले जात आहे.