गोहाना : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या नव्या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यासाठी येणाऱ्या भाजप-जजपा आघाडी सरकारच्या मंत्र्यांना साखर कारखान्यांचे कर्मचारी घेराव घालणार आहेत. हरियाणा शुगर मिल कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र राणा यांनी ही माहिती दिली. महासंघाचे प्रदेश महासचिव कृष्ण धीमान हेसुद्धा उपस्थित होते.
दैनिक ट्रिब्यून ऑनलाईनमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, गोहानामधील आहुलाना गावातील चौ. देवीलाल सहकारी साखर कारखान्याच्या प्रदेशद्वारावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला राणा यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, दहा नोव्हेंबर रोजी राज्यातील साखर कारखान्यांतील कर्मचारी कामबंद आंदोलन करतील. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबर रोजी शुगरफेडच्या पंचकुला मुख्यालयात निदर्शने केली होती. राणा म्हणाले की, राज्य सरकार साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत अजिबात गंभीर नाही. साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित लाभ ३०० करावा आणि एक्सग्रेशियाचा लाभ मिळावा, या आमच्या मागण्या कायम आहेत. त्यासाठी आगामी काळात आंदोलन तीव्र केले जाईल.