कर्नाल : मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सोमवारी कर्नाल साखर कारखान्याला भेट दिली. कारखान्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून त्यांनी गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी कारखान्यात कोट्यवधी रुपयांच्या गुतंवणुकीतून १२० केएलपीडीचा इथेनॉल प्लांट उभारणीची घोषणा केली. शिवाय, साखर कारखान्यात गूळ बनविण्याचा प्रोजेक्ट सुरू करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी कारखान्याचे संचालक, शेतकरी आणि भाकियूच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या मागण्या व सूचना जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा घेण्यात आला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गळीत हंगामाच्या तयारीची माहिती घेऊन मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी सांगितले की, कारखान्याशी १३२ गावातील २६५० शेतकरी कुटुंबे जोडली गेलेली आहेत. साखर कारखान्यासाठी ५८ लाख क्विंटल उसाचे गाळप आणि १० टक्के साखर उतारा असे उद्दिष्ट त्यांनी निश्चित केले. ते म्हणाले की कोणताही कारखाना तोट्यात सुरू ठेवणे शक्य नाही. यासाठी सर्वांनी एकजूट होवून काम केले पाहिजे. साखर उत्पादीत करून कारखान्यांना पुरेसा फायदा होत नाही. त्यामुळे उप उत्पादनांवर भर दिला जात आहे. कारखान्यात कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीतून १२० केएलपीडीचा प्रकल्प उभारला जाईल. यातून शेतकरी, कामगार आणि कारखान्याला फायदा होईल. याशिवाय लवकरच गूळ उत्पादन सुरू होईल. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पूजा भारती यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला.