रुपयाला झळाळी, डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांची घेतली झेप, शेअर बाजारातही तेजी

दीर्घ काळापासून भारतीय चलन रुपया मधील घसरणीला आता ब्रेक लागताना दिसत आहे. बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ४९ पैशांनी वधारून ८१.४३ च्या स्तरावर आला. यापूर्वी सातत्याने रुपयामध्ये घसरण सुरू होती. ऑक्टोबर महिन्यात तर पहिल्यांदाच रुपयाने ८३ चा निच्चांकी स्तर गाठला होता. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने रुपयाची घसरण सुरू होती. सप्टेंबर २०२२ मध्ये रुपयाने ८२ चा टप्पा पार केला. त्यानंतर पुढच्याच महिन्यात, ऑक्टोबरमध्ये तो आणखी घसरून ८३.०१ रुपये प्रती डॉलरवर बंद झाला होता.

आज तकमधील वृत्तानुसार, पहिल्यांदा रुपयाने ८३ चा टप्पा गाठल्यानंतर रुपयाची घसरण कमी झाली. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये उतार-चढाव सुरू होते. बुधवारी ४९ पैशांच्या वाढीने मोठा दिलासा मिळाला आहे. रशिया-युक्रेन युद्ध, माल पुरवठ्यातील अडथळे, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून सातत्याने होणारी व्याज दरवाढ याचा परिणाम रुपयावर झाला होता. डॉलर मजबूत झाल्याने भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीनंतर गुंतवणूकदार डॉलरकडे वळतात असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. जर डॉलरची मागणी वाढली तर इतर चलनांवरील दबाव वाढतो. मात्र, आता रुपयाने आपली ताकद दाखवायला सुरुवात केल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here