डेहराडून : जागतिक तापमानवाढीचा प्रभाव हवामान बदलासह कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. जर अशाच पद्धतीने तापमान वाढ सुरू राहिली तर २०८० पर्यंत देशात गव्हाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. केवळ हे एकच पिक नसून देशातील दुसरे मुख्य पिक भातामध्ये ३० टक्के आणि मक्का उत्पादनात १४ टक्क्यांची घट होऊ शकते. प्रती हेक्टर उत्पादकता घटण्यासह लोकसंख्या आणि मागणी वाढल्यास देशाला असमतोलाच्या समस्येला सामोरे जावे लागेल असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ग्लोबल वॉर्मिंग मुळे कृषी क्षेत्रावर अधिक परिणाम होत आहे. वेळेवर पाऊस न पडणे, दीर्घकाळ पडलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस, डोंगराळ भागातील भूस्खलन, सिंचनासाठी पाण्याची टंचाई, मातीची घटती सुपिकता या समस्यांमुळे गहू, तांदूळ, मक्का या पिकांच्या उत्पादकतेमध्ये घट येवू शकते. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोर्ट सेन्सिंग (आयआयआरएस) केंद्रातील संशोधकांनी हा इशारा दिला आगे. आयआयआरएसचे कृषी तथा मृदा विज्ञान विभागाचे अध्यक्ष डॉ. एन. आर. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या समितीने उत्तराखंडच्या डेहराडून, हिमालय, जम्मू- काश्मीरच्या डोंगराळ भागात संशोधन केले आहे. गेल्या तीन वर्षांतील सॅटेलाइट डेटाच्या माध्यमातून काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत.