नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांची भेट घेवून ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.
राजू शेट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यावेळी सरकारने हा निर्णय घेतला, तेव्हा ऊसाचे उप उत्पादन इथेनॉलच्या उत्पादनाबाबत कोणतेही धोरण अस्तित्वात नव्हते. एफआरपीचे धोरण तयार करताना इथेनॉल उत्पादनाचा विचार केला नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या अनुकूल धोरणात्मक निर्णयाने भारतीय साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. त्यामुळे इथेनॉल आता ऊस गाळपाचे अंतिम उत्पादन बनू पाहात आहे. तरीही साखर कारखानदार याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत वाटण्यास तयार नाहीत. सद्यस्थितीत ऊसाच्या शेतीचा खर्च खूप प्रमाणात वाढला आहे.