केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ईशान्येकडील राज्यांसाठी 1.6 लाख कोटी रुपयांच्या आगामी नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्याची घोषणा केली. आसाम येथे गुवाहाटी मध्ये ईशान्य भागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पुनरावलोकनाच्या समारोपाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या प्रकल्पांमध्ये रस्ते, रोपवे, रस्त्यांवरील पूल , ब्रह्मपुत्रा नदीवरील प्रमुख पूल आणि इतर जलमार्गांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. त्रिपुरातील उदयपूर आणि आसाममधील सिलचर येथे बहुउद्देशीय लॉजिस्टिक पार्क देखील उभारण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली ईशान्य भारतातील संपर्कातील त्रुटी भरून काढण्यासाठी आणि या भागातील वाहतुकीच्या दृष्टीने पायाभूत सुविधांना गती देण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.
रस्त्यालगत सुमारे 50 ठिकाणी वे साइड सुविधा आणि 50 ठिकाणी व्ह्यू पॉइंटस देखील विकसित केले जात आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, ते ईशान्येकडील प्रदेशातील पर्यटन क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेला लक्षणीय चालना देतील, असेही ते म्हणाले.
(Source: PIB)