तुमच्या हातात यापूर्वी कधी २००० रुपयांची गुलाबी नोट आली होती ? जरा आठवून बघा की शेवटी कधी तुम्ही दोन हजार रुपये सुट्टे करण्यासाठी फेऱ्या मारल्या होत्या. कारण, आपल्या देशाच्या चलनातील या सर्वात मोठ्या नोटेची हाताळणी कमी करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात याची माहिती दिली आहे. आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१९-२०, आर्थिक वर्ष २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षात २००० रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात याची हाताळणी खूप कमी झाली आहे.
आजतकमधील वृत्तानुसार २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर आरबीआयने २००० रुपयांची नोट जारी केली होती. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर ५०० आणि १००० रुपयांच्या सर्व नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. त्याऐवजी आरबीआयने ५०० आणि १००० रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या. आरबीआयच्या म्हणण्यानुसार २००० रुपयांची नोट या दोन्ही चलनांच्या जागी टिकून राहील. अहवालानुसार आरबीआयला २००० रुपयांच्या नोटा जारी करण्याची कमी गरज भासली आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत वितरणामध्ये २००० रुपयांच्या नोटांचा हिस्सा, आधीच्या २०१७ मधील ५०.२ टक्के हाताळणीच्या तुलनेत १३.८ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयने या नोटा बंद केलेल्या नाहीत तर त्याची फक्त छपाई थांबविण्यात आली आहे.