नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे. अलिकडेच शेतकऱ्यांना या योजनेचा १२ वा हप्ता देण्यात आला आहे. आता त्यांना पुढील हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. यादरम्यान सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे.
एबीपी लाइव्हमधील वृत्तानुसार, रामागुंडम येथे पंतप्रधान मोदी यांनी ९,५०० कोटी रुपयांच्या अनेक योजनांचा कोनशिला समारंभ केला. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षी २.५ लाख कोटी रुपये खर्च केले जातील. पीएम किसान योजनेसह अशा अनेक योजना आहेत की ज्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी राबविल्या जात आहेत. केंद्राने गेल्या आठ वर्षात जवळपास १० लाख कोटी रुपये खर्च केले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर जागतिक स्तरावरील खतांच्या वाढीव किमतींचा बोजा पडलेला नाही.
पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन लाख कोटींहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. आता डिसेंबर ते मार्च या कालावधीतील १३ वा हप्ता जमा केला जाणार आहे. देशात १४ कोटींहून अधिक शेतकरी आहेत. मात्र, योजनेचा लाभ दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे. बंद पडलेले पाच खत कारखाने सुरू केले आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.