सरकारकडून भाताच्या खरेदीत वाढ झाल्यानंतरही तांदळाचे दर वाढतील अशी शक्यता आहे. भारतासह जगभरात तांदळाचे कमी उत्पादन यासाठी कारणीभूत ठरेल. याशिवाय निर्यातीवरील निर्बंधांनंतरही देशातून तांदूळ निर्यात वाढली आहे. सरकारी गोदामातील साठा गेल्या अनेक वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. एक नोव्हेंबर रोजी तांदळाचा साठा १६५ लाख टन नोंदविण्यात आला आहे. गेल्या चार वर्षात हा कमी साठा आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३ लाख टन कमी तांदूळ शिल्लक आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला सरकारी गोदामांमध्ये २२९ लाख टन तांदळाचा साठा होता. यावर्षी भारतासह जगभगात तांदळाचे उत्पादन घटेल असे अनुमान वर्तविण्यात आले आहे. देशांतर्गत खप वगळता उर्वरीत साठा कमी राहिल अशी शक्यता आहे. म्हणजेच जागतिक स्तरावर तांदळाचा पुरवठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असेल. भारताकडून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये तुकडा तांदळाचा मोठा हिस्सा आहे. २०२२ मध्ये एकूण ९३.५३ लाख मेट्रिक टन तांदूळ निर्यात झाली आहे. यामध्ये तुकडा तांदळाचा हिस्सा २१.३१ लाख मेट्रिक टन आहे. भारतातील एकूण तांदूळ निर्यातीमध्ये तुकडा तांदळाचा हिस्सा २२.७८ टक्के आहे.