पुणे / कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेद्वारे दोन दिवस ऊस तोड बंद करण्याच्या आवाहनानंतर गुरुवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ऊस तोडणी बंद करण्यात आल्या. सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये आमच्या आवाहनाला पाठबळ मिळाले, असा दावा माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीसह अनेक मागण्या केल्या आहेत.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी इथेनॉलच्या दराचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी साखर कारखान्यांकडून हा मुद्दा उपस्थित केला जात होता. आम्हाला अपेक्षा आहे की सरकार आमच्या मागण्या मान्य करेल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनानंतर पहिल्या दिवशी सांगली जिल्ह्यातील काही कारखाने आणि सांगलीच्या वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक थांबविण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला शेट्टी यांनी पुण्यात साखर आयुक्त कार्यालयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी रॅली काढली होती. एकरकमी एफआरपी देणे, साखरेची किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ, इथेनॉलच्या किमतीमध्ये वाढ यांसह अनेक मागण्या त्यांनी आयुक्तांसमोर केल्या आहेत. त्यानंतर शेट्टी यांनी मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत तर साखर कारखाने बंद पाडू अशी घोषणा केली होती. या अंतर्गत १७ व १८ नोव्हेंबर रोजी ऊस तोडणी स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तोडणी बंद आंदोलन केले आहे.