सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांना नजरेसमोर ठेवून सुरू केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत. या वेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये १६,००० कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. तर ११ व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना २१,००० कोटी रुपये देण्यात आले होते. ११ व्या हप्त्यामध्ये १० कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते. यावेळी, १२ व्या हप्त्यामध्ये दोन कोटी कमी म्हणजे आठ हजार कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांना अद्याप चालू हप्त्यामधील पैसे मिळालेले नाहीत, त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पैसे मिळू शकतात.
मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या माहितीनसार, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत बनावट शेतकरी लाभ घेत होते, असे सरकारचे म्हणणे आहे. यासाठी ई केवायसी अत्यावश्यक करण्यात आली. त्यामुळे बनावट शेतकरी योजनेपासून दूर गेले आहेत. जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना पैसे दिले. अशात काही पात्र शेतकरीही योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना आतापर्यंत १२ व्या हप्त्याचा फायदा मिळालेला नाही. सरकार त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत पैसे देणार आहे. ज्यांना पैसे मिळाले नाहीत, ते शेतकरी कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू शकतात. त्यामुळे १३ व्या हप्त्यापूर्वी, १२ व्या हप्त्याचे पैसे या महिन्याच्या अखेरीस देण्यात येणार आहेत.