नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी पाच योजनांतून शेतकऱ्यांना हमखास लाभ मिळू शकतो. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह खत, पीकविक्रीची सुविधा आणि विमा इत्यादींचा लाभ देणार्या केंद्र सरकारच्या अशा पाच योजनांची माहिती देण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान, खत अनुदान योजना, किसान रथ योजना, पीक विमा आणि कृषी विपणन आणि खरेदी या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. या सर्व सुविधा किसान सुविधा पोर्टल अंतर्गत मिळू शकतात.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आलीआहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली योजना डिसेंबर २०१८ मध्येच लागू करण्यात आली. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपयांचा हप्ता दिला जातो. हा हप्ता शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा मिळतो. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. याशिवाय शेतकऱ्यांना खतावर अनुदान देण्यासाठी शासनाने खत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कमी दरात खत दिले जाते. हे अनुदान सरकार खत देणाऱ्या कंपन्यांना देते, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत मिळते. याशिवाय सरकारने किसान रथ योजना लॉकडाऊनदरम्यान सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकरी आपले पीक बाजारात नेऊन चांगल्या भावात विकू शकतो. या योजनेंतर्गत शेतकरी भाजीपाला धान, गहू इत्यादी बाजारात नेऊ शकतो. पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न केले जातात. पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पीक विम्याअंतर्गत तक्रार दाखल करता येते. कृषी विपणन आणि खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांची पिके विकण्याची सुविधा देण्यात आली आहे. यावर नोंदणी करून शेतकरी आपले पीक जवळच्या बाजारात विकू शकतात. यासोबतच व्यापारी इथून शेतकऱ्यांना माफक दरात खरेदी करू शकतात.