लखनौ : युवा शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रगतशील युवा ऊस उत्पादक शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डालीबाग येथील ऊस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये व्हर्च्युअल माध्यमातून साखर उद्योगाचे अप्पर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी सहारनपूर परिक्षेत्रातील युवा शेतकऱ्यांशी संवाद साधला. युवकांना ऊस शेतीच्या माध्यमातून उद्यमशीलतेसोबत जोडण्यासाठी राज्य सरकार जोर देत आहे, असे त्यांनी सांगितले.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, प्रती हेक्टरी उत्पादन वाढीसाठी युवा शेतकऱ्यांनी नव्या प्रयोगांवर भर दिला पाहिजे. ऊस उत्पादकांना नवनवीन योजनांसोबत उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. उत्पादकता पुरस्कारांच्या माध्यमातून युवा शेतकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढीला लागत आहे. सद्यस्थितीत युवा शेतकरी शेतीपासून दूर होत छोट्या-मोठ्या नोकरीसाठी शहरांकडे पलायन करीत आहेत. हे थांबवून युवकांना शेतीकडे आकृष्ट करण्यासाठी योजना राबविल्या जात आहेत, असे सांगण्यात आले. सहारनपूरचे शेतकरी मोबीन, अमित विश्वकर्मा, शामली येथील सूरज चौहान हे शेतकरी व्हर्च्युअल माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होते.