देशाच्या काही राज्यांतील शेतकरी यावर्षी पूर, दुष्काळ, अतिवृष्टीने हवालदिल झाला आहे. आता पिकांवरील कीड, रोगांचा फटका बसू लागला आहे. यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थानमध्ये पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाले. तर छत्तीसगढ, बिहार, झारखंडमधील शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. केंद्र सरकार पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मदत करीत आहे. तर राज्य सरकारनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली आहे. आता झारखंड सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे.
एबीपी लाईव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना दु्ष्काळातील मदतीचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला रोख ३,५०० रुपये दिले जातील. ही सुरुवातीची मदत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. झारखंड सरकारने केंद्राकडे मदतीच्या पॅकेजची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून पूर, दुष्काळ, अतिवृष्टी अशावेळी राज्यांना मदत पुरवली जाते. तशा मदतीची मागणी केली आह. झारखंड सरकारने २९ ऑक्टोबक रोजी राज्यातील २६० विभागांपैकी २२६ विभाग दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर केले आहे. बिहार सरकारनेही ११ जिल्ह्यातील ७८४१ गावांतील कुटुंबांना साडेतीन हजार रुपयांची मदत दिली आहे.