सिमला : हिमाचल प्रदेशच्या कृषी विभागाने राज्यात अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी गव्हाच्या जादा उत्पादन देणाऱ्या दोन वाणांचे सादरीकरण केले आहे. डीबीडब्ल्यू २२२ आणि डीबीडब्ल्यू १८७ या दोन वाणांचा यामध्ये समावेश आहेत. सध्याच्या प्रचलीत असलेल्या वाणांपासून प्रती क्विंटल ३५ ते ३७ उत्पादन मिळते. या वाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६० क्विंटल प्रती हेक्टर उत्पादन मिळू शकेल. हिमाचल प्रदेश कृषी विभागाशी संबंधीत घडामोडींचे तज्ज्ञ राजीव मिन्हास यांनी सांगितले की, या दोन प्रजातींचे जवळपास २३,००० क्विंटल बियाणे ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मिन्हास यांनी सांगितले की, डीबीडब्ल्यू २२२ (करण नरेंद्र) या वाणामध्ये उच्च किड प्रतीरोधक क्षमता आणि सहनशीलता आहे. याच्या पेरणीचा कालावधी अनुकूल असतो. तर डीबीडब्ल्यू १८७ (करण वंदना) या वाणामध्ये प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर समावेश असतो. कृषी संचालक बी. आर. ताखी यांनी सांगितले की, कांगडा, ऊना, हमीरपूर, सोलन, बिलासपूर आणि सिरमौर जिल्ह्यात या नव्या वाणांची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आली आहे. कारण या काळात मातीमधील ओलावा अधिक असल्याने आणि पावसावर आधारित क्षेत्रांमध्ये वेळेवर पेरणी केल्यास त्याचा फायदा होईल. राज्यात ३.३० लाख हेक्टरमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जात असून एकूण ६.१७ लाख टन गहू उत्पादनाचे उद्दीष्ट आहे.