मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सलग पाचव्यांदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेट ०.३५ टक्के वाढविण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता रेपो रेट ५.९० टक्क्यावरून ६.२५ टक्के होईल. यासोबतच होम लोन सह इतर सर्व कर्जे महागणार आहेत. बुधवारी एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढीची माहिती जारी करण्यात आली. वर्षअखेरीस वाढविण्यात आलेल्या या दरामुळे केंद्रीय बँकेने यावर्षी आतापर्यंत २.२५ टक्क्यांची वाढ केल्याचे स्पष्ट झाले.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, देशातील महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. पुढील बारा महिन्यांत महागाईचा दर ४ टक्क्यांच्या वर राहील अशी अपेक्षा आहे. ऑक्टोबर महिन्यात रिटेल महागाईचा दर घसरून ६.७७ टक्क्यांवर आला आहे.
मुंबईत सहा सदस्यांच्या एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नरनी सांगितले की स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर ६ टक्के आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर ६.५ टक्क्यांपर्यंत समायोजित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जीडीपीचा दर ६.८ टक्के राहिल, असे अनुमान आहे. यापूर्वी हा दर ७ टक्के राहिल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. जागतिक आव्हानांनंतरही भारताचा विकास दर स्थिर असल्याचे दास यांनी सांगितले. मे २०२२ पासून आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढीस सुरुवात केली होती.