देशात गहू तुटवड्याचे संकट निर्माण होताना दिसत आहे. बाजार समित्यांमध्ये गव्हाचे दर एमएसपीपेक्षा ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. केवळ गव्हाचे नव्हे तर आट्याचेही दर गगनाला भिडले आहेत. या किमतींमध्ये आणखी तेजी दिसून येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यस्थितीत गव्हाचा घाऊक दर ३० रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचला आहे. तर एमएसपी पेक्षा हे दर ३०-४० टक्के अधिक आहेत. गव्हाची एमएसपी २०.१५ रुपये प्रती किलो आहे. गेल्या चार महिन्यांत हा दर ४ रुपयांनी वाढला आहे. तर आट्याचे दर १७-२० टक्क्यांनी वाढले आहेत.
मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ यादरम्यान सरकारच्या गव्हाच्या साठ्यामध्ये ५६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. उत्पादनात झालेली घट आणि निर्यात वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक मार्केटमधील गव्हाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तेव्हा भारताने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात केली होती. त्यामुळे देशातील गव्हाचा साठा खालावला. हा साठा गेल्या १४ वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे किमतींवर परिणाम झाला आहे. मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने यावर्षी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट शिपमेंट गहू निर्यात करण्यात आला होता. सरकारकडे १ ऑक्टोबर २०२२ अखेर २.२७ कोटी टन गहू होता. तर नियमानुसार या कालावधीत बफर स्टॉक म्हणून २.०५ कोटी टन गव्हाची गरज होती.