बेंगळुरू : कर्नाटकमध्ये उसाच्या दराचा प्रश्न दिवसेंदिवस तापू लागला आहे. बेंगळुरू, म्हैसूर आणि इतर जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने शेतकरी उसाच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ संबंधित राज्यांच्या खासदारांसह २० डिसेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत. तर कर्नाटकातील ऊस उत्पादकांनी सरकारला त्यांच्या विविध मागण्यांसाठी २३ डिसेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. आता त्यांनी हिवाळी अधिवेशन संपत असताना २६ डिसेंबरला बेळगावमधील सुवर्ण विधान सौधाजवळ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.