हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
सांगली: चीनी मंडी
जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून यावर्षी साखरेचे जिल्ह्यात विक्रमी एक कोटी क्विंटलहून अधिक उत्पादन होईल, असा साखर कारखानदारीतील तज्ज्ञांचा अंदाज आहे. आतापर्यंत बारा साखर कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली असून ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आगामी काळात उर्वरीत चारही कारखान्यांचा गळीत हंगाम बंद होईल अशी शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत ८१ लाख ६४ हजार ६६६ टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंत ९९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याचे साखर सहसंचालक विभागातील सूत्रांनी सांगितले. यंदा १२.३६ टक्के सरासरी उतारा मिळाला आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या काही वर्षांत अपग्रेडेशन करून गाळप क्षमता वाढविली आहे. त्यामुळे यंदा एक कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन होईल अशी शक्यता आहे.
आतापर्यंत सर्वोदय, हुतात्मा, माणगंगा, सद्गुरू श्री श्री शुगर, महांकाली, राजारामबापू, वाटेगाव युनिट, सोनहिरा, क्रांती, विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, यशवंत शुगर, उदगिरी शुगर या कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत. तर, उर्वरीत चार कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहेत. हंगामात उसाचे गाळप ८३ लाख टनांहून अधिक होईल, असे दिसते. साखरेचे यंदा होणारे विक्रमी उत्पादन पाहता शेतकऱ्यांना बिलेही लवकर मिळतील. मात्र, जादा साखरेच्या प्रश्नाने कारखानदारांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp