ऋषिकेश : सरकारने लवकरात लवकर ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी केली. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर चौदा दिवसांमध्ये ऊस बिले देणे सरकारला बंधनकारक आहे, असे ते म्हणाले. डोईवाला येथे सोमवारी राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष व्ही. एम. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना ऊस नियंत्रण नियमावलीनुसार चौदा दिवसांत पैसे मिळणे गरजेचे आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सिंह यांनी सांगितले की, चौदा दिवसांत पैसे मिळणे, हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांच्या हक्कांवर आक्रमण करीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये असे अनेक कारखाने आहेत की, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांचे ऊस बिल दिलेले नाही. जर २ जानेवारीपूर्वी ऊस बिले दिली नाहीत, तर शेतकरी कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करतील. यावेळी संयु्क्त शेतकरी आघाडीशी संलग्न जाहिद अंजुम, सुरेंद्र सिंह राणा, तेजिंदर सिंह आदींसह नेते उपस्थित होते.