नवी दिल्ली : गेल्यावर्षी गव्हाच्या उत्पादनात झालेली घट लक्षात घेवून केंद्र आणि राज्य सरकारांचे लक्ष गव्हाच्या उत्पादनाकडे लागले आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यातील गव्हाची आकडेवारी एकत्र करीत आहे. यासोबतच राज्यांतील गव्हाचे पेरणी अडचणीत आहे का याचीही पडताळणी करण्यात येत आहे. दोन राज्यांतील पेरणी काही प्रमाणात कमी दिसून आली आहे. तर उर्वरीत राज्यांमध्ये अधिक उत्पादन दिसून येत आहे. केंद्र सरकारने उत्पादन वाढण्याची काही कारणेही असल्याचे म्हटले आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रमुख उत्पादक राज्यातील गव्हाचे पिक चांगले येण्याची शक्यता आहे. सध्याच्या तापमानातील वाढ आणखी चांगल्या उत्पादनासाठी अनुकूल बनले आहे. कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेल्या रब्बीच्या हंगामात गेल्या आठवड्याअखेर गव्हाचे लागवड क्षेत्र ३ टक्क्यांनी वाढून २८६.५ लाख हेक्टर झाले आहे. हवामानाची स्थिती आणि पिकाअंतर्गत २०२२-२३ या हंगामात अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी तापमान अधिक नसेल असे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २०२१-२२ मध्ये काही राज्यांत उष्णतेच्या लाटांमुळे गव्हाचे उत्पादन १०९.५९ मिलियन टनापासून घसरून १०६.८४ मिलियन टन झाले होते.