नवी दिल्ली : देशातील ज्या शेतकऱ्यांनी आताच रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. भारत सद्यस्थितीत टोळांपासून मुक्त आहे. लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशन (जोधपूर) द्वारे करण्यात आलेल्या नियमित सर्वेक्षणादरम्यान, १-१५ डिसेंबर २०२२ या दरम्यान, करण्यात आलेल्या वाळवंटातील सर्व्हेमध्ये टोळांच्या हालचालींपासून देश मुक्त असल्याचे दिसून आले आहे. या काळात टोळांच्या प्रजनानाची सूचना मिळालेली नाही. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळात केली जाते. आणि परिपक्वतेच्या आधारावर जानेवारी ते मार्च या काळात या पिकांची कापणी केली जाते.
याबाबतच्या नव्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, एकूण ११० जागांवर, राजस्थान आणि गुजरात क्षेत्रात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सर्व्हे करताना वाळवंटाच्या परिसरात पावसाची स्थिती दिसली नाही. सर्वेक्षकांच्या पाहणीनुसार, सुरतगड, बिकानेर, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये पिके हिरवी आणि नागोर, फलोदी, जोधपूर, जालोर, पालनपूर तसेच भूजमध्ये वाळलेली दिसून आली. सुरतगढ आणि पालनपूर भागातील काही परिसर वगळता इतर ठिकाणी जमिनीत ओलसरपणा दिसून आला. भारतात पुढील पंधरवड्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या टोळांच्या हालचालींची शक्यता नाही. भारत वगळता इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही सध्या स्थिती चांगली आहे.
२०२० च्या सुरुवातीला पाकिस्तानमध्ये टोळांचा धोका अधिक होता. तेव्हा देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. त्यावेळी भारतातही राजस्थान, गुजरात, पंजाबच्या काही भागात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात टोळधाड दिसून आली होती. टोळधाडीने एप्रिल महिन्यात भारतात पहिल्यांदा प्रवेश केला आणि पाकिस्तानची सीमेलगत राजस्थानमधील काही जिल्ह्यांत त्यांचा उपद्रव दिसून आला होता.