नवी दिल्ली : देशात यावर्षी धान्याचे संकट निर्माण होणार नाही. विविध राज्यांमध्ये गव्हाची बंपर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाच्या पेरणीचा आकडा वाढला आहे. केंद्र सरकारकडील आकडेवारीमुळे सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे. ३० डिसेंबरअखेर गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र जोरदारपणे वाढले आहे. धान्याबाबत कोणीही घाबरून जावू नये. देशात गव्हासह इतर सर्व धान्याचा साठा पुरेसा आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी मंत्रालयाकडील ३० डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीतून गव्हाची पेरणी ३२५.१० लाख हेक्टर झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही पेरणी ३.५९ टक्के वाढली आहे. गेल्यावर्षी गव्हाची पेरणी ३१३.८१ लाख हेक्टरमध्ये झाली होती. रब्बी हंगामातील पिकांमध्ये गव्हासह मक्का, ज्वारी आणि मोहरीचा सावेश आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत रब्बीची पेरणी केली जाते. यंदा यामध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात ३.५९ लाख हेक्टर, राजस्थानमध्ये २.५२ लाख हेक्टर, महाराष्ट्रात १.८९ लाख हेक्टर, गुजरातमध्ये १.१० लाख हेक्टर, बिहारमध्ये ०.८७ लाख हेक्टर, मध्य प्रदेशात ०.८५ लाख हेक्टर, छत्तीसगढमध्ये ०.६६ लाख हेक्टर, पश्चिम बंगालमध्ये ०.२१ लाख हेक्टरमध्ये पेरणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली असल्याचे कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. राज्यात ऊस तोडणीही सुरू आहे. त्यामुळे शेतकरी त्यानंतरही गव्हाची पेरणी करतील अशी शक्यता आहे. यंदा उच्चांकी गव्हाचे उत्पादन होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाणिज्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात गव्हाची निर्यात २९.२९ टक्क्यांनी वाढून १.५० अब्ज डॉलर झाली आहे. तांदूळ निर्यातही वाढली आहे.