इस्लामाबाद : बलुचिस्तानमध्ये गव्हाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. सरकारने सरकारकडून मागणी करूनही केंद्र सरकारने गव्हाची खेप पाठवलेली नाही. याबाबत डॉन वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, मंत्री जमरक खान पिरालिजाई यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की अन्न विभागाकडील गव्हाचा साठा जवळपास संपुष्टात आला असून त्यांनी इतर राज्ये आणि केंद्राकडून तातडीची मदत मागितली आहे. आम्ही खूप गंभीर संकटाचा सामना करीत आहोत आणि आणीबाणीच्या स्थितीत जवळपास ६,००,००० पोती गव्हाची गरज आहे. मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी शेजारील पंजाब तसेच सिंध प्रांत आणि केंद्राकडे आपली मागणी नोंदवली आहे. इस्लामाबाद, पंजाब आणि सिंधने गहू देण्यास नकार दिला आहे, असा दावा त्यांनी केला.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री आणि तेहरिक ए इन्साफचे नेते हम्माद अजहर यांच्या हवाल्याने द न्यूजने म्हटले आहे की, आगामी काळात पाकिस्तानमध्ये धान्य संकट अधिक गंभीर होण्याचा धोका आहे. जर संयुक्त सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटींचा स्वीकार केला तर महागाई ४० टक्क्यांपर्यंत वाढू शकते. त्यांनी पीएमएल-एनच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला अवघ्या नऊ महिन्यात आर्थिक कडेलोटाच्या टोकावर नेल्याचा आरोप केला. पाकिस्तानमध्ये २०२२ मधील मान्सूनच्या पुरानंतर महागाईत प्रचंड गतीने वाढ झाल्याचे म्हटले आहे. तर ग्रामीण भागात ऑगस्टच्या कालावधीत महागाई ३० टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले जाते.