शामली : ऊन तहसील क्षेत्रातील सुपीरियर फूड ग्रेन्स प्रायव्हेट लिमिटेडने मागील गळीत हंगाम २०२१-२२ ची सगळी बिले जमा केली आहेत. त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. मात्र, नवीन गळीत हंगाम २०२२-२३ सुरू होवून दोन महिने उलटले तरी अद्याप बिले जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊन विभागातील सुपिरियर फूड ग्रेन्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याने २०२१-२२ मध्ये ९७.४९ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. त्यापोटी ३३७ कोटी रुपये देय होते. गेल्या गळीत हंगामातील सर्व पैसे कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना दिले. यावेळी २०२२-२३ च्या गाळप सत्र १२ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. जवळपास दोन महिन्यांत कारखान्याने ३८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. मात्र या वर्षी अद्याप बिले दिलेली नाहीत. या संदर्भात ऊस महाव्यवस्थापक कुलदीप पिलानिया यांनी सांगितले की, ऊन साखर कारखान्याने मागील गळीत हंगामाची थकबाकी दिली आहे. मात्र, थानाभवन आणि शामली कारखान्याची ऊस बिले अद्याप अदा व्हायची आहेत. चालू हंगामातील बिलेही शेतकऱ्यांना देण्यास सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.