काठमांडू : बारां आणि परसा विभागातील ऊसावर सर्वाधिक घातक लाल सड बुरशीचा फैलाव झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घसरण आल्याचे दिसून आले आहे. लाल सड रोगामुळे उसाच्या जमिनीवरील बहुतांश भागाचे नुकसान होते. या रोगाचे संक्रमण झाल्यास उसाचे वजन झपाट्याने घटते. नेहमीच्या, चांगल्या उसाच्या तुलनेत रोगग्रस्त उसामध्ये शुक्रोज कमी असतात. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सहरुम राऊत गद्दी यांनी सांगितले की, लाल सड रोगाचा फैलाव सीमावर्ती जिल्ह्यांतील पिकांवरही झाला आहे.
कालीकमाई ग्रामीण नगर पालिका ५ मधील एक शेतकरी पृथ्वी साह यांनी गेल्यावर्षी जवळपास एक हेक्टर जमिनीवर उसाचे उत्पादन घेतले होते. त्यांचे हे नवे पिकही या रोगाच्या विळख्यात सापडले आहे. साह यांनी सांगितले की, उसाची रोपे वाळू लागली आहेत. मला वाटत नाही की मी गुंतवणुकीच्या एक चतुर्थांश हिस्साही वसूल करू शकेन. साह यांच्या म्हणण्यानुसार Co 0238, एक उच्च उत्पादन देणारी प्रजाती असल्याने तिची शिफारस गेली बारा वर्षे रिलायन्स शुगर मिलच्यावतीने करण्यात आली होती. साह यांनी सांगितले की, आम्ही साखर कारखान्याच्या शिफारसीनंतरच या प्रजातीचे उत्पादन घेतले. आता शेतकरी हक्क संघर्ष समितीने कारखान्याकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली आहे. पिकाला रोगापासून वाचविण्यासाठी शेतकरी लवकर याची तोडणी करीत आहेत. कारण सरकारनेही आतापर्यंत या हंगामासाठी उसाचा किमान समर्थन दर निश्चित केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उधारीवर ऊस विक्री करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारखाने शेतकऱ्यांना ५९० रुपये प्रती क्विंटल दर देत आहेत. हा दर गेल्या हंगाातील किमान समर्थन मूल्य आहे.