यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२२ ते जून २०२३ या हंगामात गव्हाचे उत्पादन ११२ दशलक्ष टनांच्या पुढे जाऊ शकते. हा एक नवीन विक्रम असेल. गुड न्यूज टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी २०२०-२१ या हंगामात देशात १०९.५९ दशलक्ष टन गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले होते. यानंतर, २०२१-२२ मध्ये, उष्णतेच्या लाटेमुळे देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये उत्पादन १०६.८४ दशलक्ष टनांवर आले.
यंदा मात्र चांगले हवामान आणि जास्त पेरणी लक्षात घेता गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील मुख्य रब्बी पीक गव्हाची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू झाली. तर काढणी मार्च-एप्रिलपासून सुरू होईल. याबाबत ताज्या आकडेवारीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ६ जानेवारीपर्यंत ३३२.१६ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी केली आहे. गेल्यावर्षी याच काळात देशात ३२९.८८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा राजस्थानात गव्हाची सर्वाधिक पेरणी २.५२ लाख हेक्टरमध्ये झाली आहे. याखालोखाल उत्तर प्रदेशात १.६९ लाख हेक्टर आणि महाराष्ट्रात १.२० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. गुजरात, छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अधिक पेरणी झाल्याची नोंद आहे.