उत्तर प्रदेश : या आठवड्यात संपणार ऊस दरवाढीची प्रतीक्षा

लखनौ : गळीत हंगाम सुरू होवून तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, सरकारने २०२२-२३ मधील ऊस दर अद्याप जाहीर केलेला नाही. उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढ करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तर ऊस मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात दरवाढीची घोषणा केली जाईल असे सांगितले आहे.

राज्यातील १२० साखर कारखान्यांशी ६० लाखांहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी जोडले गेले आहेत. आतापर्यंत ऊस दर जाहीर झाला नसल्याने कारखाने गेल्यावर्षीच्या ३४०-३५० रुपये प्रती क्विंटल दराने ऊस खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांची मागणी पाहता ऊस विभागातील खासदार, इतर नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक पाहता यंदा ऊस दरवाढ गरजेची असल्याचे म्हटले आहे. जर पुढील वर्षी ऊस दरवाढ दिली गेली तर ती निवडणुकीसाठी वाढ केली गेली असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे यावर्षी दरात वाढ करणे गरजेचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ऊस समितीचे माजी अध्यक्ष डॉ, अरविंद सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा वाढता उत्पादन खर्च पाहता दरवाढ गरजेची आहे. शेतकरी नेत्यांनीही तशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here