पाकिस्तानची सद्यस्थिती आता कोणापासूनही लपून राहिलेली नाही. देशाकडे पेट्रोलियम पदार्थ, जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे पुरेसे नसल्याची स्थिती आहे. परकीय चलन साठ्यात मोठी घसरण झाली आहे. तर गेल्या सहा महिन्यांत तेथे १.२ अब्ज डॉलर (२५९ अब्ज रुपये) किमतीच्या महागड्या कार्स, अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांची आयात करण्यात आली आहे. प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, पाकिस्तानावर सध्या मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यांच्याकडील परकीय चलन जवळपास चार अब्ज डॉलरवर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या सेंट्रल बँकेने फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीला मंजुरी दिली आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की काही वस्तूंची आयात कमी करावी लागली आहे.
टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहने, इतर वस्तूंच्या आयातीत मात्र घट झालेली नाही. सरकारला ही आयात कमी करायची आहे. अर्थव्यवस्था अडचणीत असतानाही महागड्या, लक्झरी कार्स, जीवनावश्यक नसलेल्या वस्तू आयात केल्याने मोठा दबाव वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत पाकिस्तानने ५३.०५ कोटी डॉलर (११८.२ अब्ज रुपये) सीबीयू कार आणि त्याच्या पार्ट्सच्या खरेदीवर घालवले आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये वाहतूक क्षेत्रासाठी १४.०७ कोटी डॉलरच्या साहित्याची आयात करण्यात आली होती. यातील ४.७५ कोटी डॉलरची आयात कारसाठी करण्यात आली होती. आर्थिक संकट असतानाही सरकारने महागड्या गाड्यांच्या आयातीवरील निर्बंध हटवले आहेत. यातून डॉलर अधिक वेगाने खर्च होत असल्याचे सांगितले जाते.