नवी दिल्ली : जीएसटी परिषदेची ४९ बैठक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी नवी दिल्लीत होणार आहे. याबाबत जीएसटी परिषदेने केलेल्या ट्विटनुसार, जीएसटी परिषदेची ही बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
परिषदेच्या या ४९ व्या बैठकीत ‘पान मसाला’, ‘गुटखा’ कंपन्यांवरील कर आकारणी, जीएसटीच्या दाव्यांबाबत अपील न्यायाधिकरणाची स्थापना आणि ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतींवरील जीएसटी आकारणी या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी १७ डिसेंबर २०२२ केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४८ वी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे झाली होती. यात जीएसटी कर दरातील बदल, व्यापार सुलभीकरण उपाय आणि वस्तू आणि सेवा कराचे अनुपालन सुव्यवस्थित करण्याच्या उपायांशी संबंधित अनेक शिफारशी सादर केल्या आहेत.