बंगळुरू येथे ऊर्जा संक्रमण कार्य गटाच्या पहिल्या बैठकीत सहभागी झालेल्या जी 20 सदस्य देशांनी ऊर्जा सुरक्षा आणि नवीन ऊर्जा स्रोतांसाठी विविध पुरवठा साखळी साध्य करण्यासाठी प्राधान्य क्षेत्रांमध्ये सामूहिक प्रयत्नांबाबत सहमती दर्शवली आहे.
आजच्या पहिल्या ऊर्जा संक्रमण कार्य गटाच्या बैठकीतील चर्चेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना, ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांनी सांगितले की, या सत्रांमध्ये मांडण्यात आलेल्या सूचना आणि शिफारशी आगामी कार्यगटाच्या बैठकांसाठी पाया रचतील आणि सरकार त्यावर निश्चितपणे काम करेल. या कार्यगटाच्या एकूण चार बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वांना स्वच्छ ऊर्जा सुनिश्चित करणे आणि न्याय्य, किफायतशीर आणि समावेशक ऊर्जा संक्रमण उपाययोजना यासारख्या प्राधान्य क्षेत्रांवर उद्या पुन्हा चर्चा सुरू होईल.
जागतिक बँक, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसह G20 देश आणि नऊ विशेष आमंत्रित अतिथी देशांचे 150 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
(Source: PIB)