नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संसदेत सांगितले की, अलीकडच्या काळात कृषी आणि शेती संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, २०१९-२० या वर्षात कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीचे मूल्य २,५२,४०० कोटी रुपये होते, जे २०२०-२१ मध्ये वाढून ३,१०,१३० रुपये झाले आहे. साधारणपणे ही वाढ २२.८७ टक्के असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, गेल्या आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये २०.८७ टक्के वृद्धीसह कृषी आणि त्याच्या उत्पादनांच्या निर्यातीने ३,७४,६११ कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे. कृषी मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, पश्चिमेकडील प्रदेशात कृषी आणि संबंधित उत्पादनांच्या निर्यातीत गुजरात आणि महाराष्ट्र आघाडीवर आहेत. पूर्वेकडील आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि हरियाणा, तर विभागात कर्नाटक आणि केरळ या राज्यांनी सर्वाधिक कृषी उत्पादनांची निर्यात केली.
टीव्ही९ने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी मंत्रांनी सांगितले की, २०२१-२२ या आर्थिक वर्षात सागरी उत्पादनांचे मूल्य १३,७३४.६१ कोटी रुपयांनी वाढले, तर साखरेच्या मूल्यात १३,६७६.१२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये निर्यात केलेल्या गव्हाच्या मूल्यात ११,६७२.३७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर बासमती वगळता तांदळाचे मूल्य १०,१६८.३९ कोटी रुपयांनी वाढले आहे. २०२१-२२ मध्ये कच्च्या कापसाच्या निर्यातीचे मूल्य ७,०३८.६६ कोटी रुपयांनी वाढले आहे. इतर धान्यांच्या किमतीत २९११.०४ रुपयांनी वाढ झाली आहे. २०२१-२२ या वर्षात दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यात मूल्यात २,३५२.९३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर कॉफीच्या निर्यात मूल्यात २,२७३.९७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०२१-२२ मध्ये, एरंडेल तेल निर्यातीचे मूल्य १,९५२.३६ कोटी रुपयांनी वाढले आहे, तर विविध प्रक्रिया केलेल्या वस्तूंचे मूल्य २,३११.८६ कोटी रुपयांनी वाढले आहे.