लखनौ : उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमुळे राज्याचे भविष्य बदलेल आणि आगामी तीन वर्षांमध्ये हा बदल दिसून येईल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटअंतर्गत दधिची हॉलमध्ये आयोजित एका सत्रामध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले की, आज उत्तर प्रदेशमध्ये देशातील कोणत्याही राज्यांतील उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व काही आहे. उत्तर प्रदेश सर्व निर्णय लवकर घेत आहे. धोरणे बनविण्यात आता कोणताही अडथळा नाही.
उत्तर प्रदेशातील मजबूत कायदा-सुव्यवस्था आणि मजबूत पायाभूत सुविधांची प्रशंसा करताना अमित शहा म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या कायदा-सुव्यवस्थेमध्ये सुधारणा झाली आहे. पायाभूत सुविधांचा विकास झाला आहे. आणि उद्योगाला पाठबळ देण्यासाठी अनेक धोरणे तयार करण्यात आली आहेत. देशाच्या विकासासाठी हे चांगले संकेत आहेत.
गृहमंत्री शहा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश विकासाची खूप संधी आहे. देशात ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तयार करण्यात उत्तर प्रदेश महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकतो. गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशची क्षमता लक्षात आल्यानंतर ते येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत.
आधीच्या सरकारांवर निशाणा साधताना शहा म्हणाले की, दिल्लीत इन्व्हेस्टर्स समिट आयोजन करण्याचे कारण असे होते की, लखनौतील गुंतवणूकदार आधीच्या सरकारच्या अंतर्गत काम करण्यास तयार नव्हते. ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशला पुढे घेऊन जाणे म्हणजे देशाच्या विकासाला गती देणे होय. युपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटदरम्यान केलेल्या गुंतवणुकीचा भारतालाही फायदा होईल. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश पायाभूत सुविधा तसेच कायदा व सुव्यवस्थेमध्ये देशासाठी आदर्श बनले आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ‘ओडीओपी’ आज आत्मनिर्भर भारतासाठी एक महत्त्वाची आधारशीला बनली आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, राज्यातील सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग हे देशाचा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे. राज्यात ९८ लाख एमएसएमई युनिट्स आहेत. २०१७ पूर्वी त्यांची प्रत्येक क्षेत्रात उपेक्षा होत होती. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये एमएसएमईचा क्लस्टर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिशादर्शक कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी जागतिक स्तरावर गुंतवणूक आकर्षित करीत आहे. राज्यातील एमएसएमई युनिट्स देशाला एक नवा आयाम देण्यासाठी सहकारी चळवळीच्या रुपात प्रभावी भूमिका निभावू शकतात. या सत्रामध्ये उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, मंत्री जितिन प्रसाद, राकेश सचान, दयाशंकर आणि जे. पी. एस. राठोड यांच्यासह इतर उपस्थित होते.